विशेष !

मरणाला रात्र आडवी !


********************************


 

 


 

देशात कोरोना व मध्यप्रदेशचे राजकारण दोनच विषय चर्चेचे आहेत असा एकूण माध्यमांचा सुर आहे. मध्यप्रदेशचे सरकार स्थापन झाल्यापासूनच ज्योतीरादित्य सिंधीया विरुध्द कमलनाथ व्हाया दिग्विजयसिंग असा सामना सुरु होता. मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असलेले ज्योतिरादित्य सिंधीया यांना डावलून कमलनाथ यांना दिलेली संधीच त्यांना भाजपाच्या जवळजवळ जाण्यास परावृत्त करीत होती. अनेकदा ज्योतिरादित्य यांनी पक्षधोरणाला बाजुला सारत पंतप्रधान मोदी यांच्या अनेक निर्णयाचे स्वागत केले. तेव्हाच काँगे्रस पक्षनेतृत्वाने त्यांची नाराजी लक्षात घेवून समज काढण्याची गरज होती, पण काँगे्रसमधील जेष्ठ सल्लागार मंडळी कधीच पक्षातील खदखद लक्षात घेत नाही हे अनेकदा सिध्द झाले आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मर्यादा व राहुल गांधी यांचे नेतृत्व थोपण्याचा प्रयत्न दोन्ही मध्ये काँगे्रस पक्षाची फरपट सुरु आहे. त्यामुळे काँगे्रस पक्षनेत्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्हीवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

 

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासोबत 20 आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे सरकार अल्पमतात आले आहे. परंतु सत्ता सोडायचीच नाही, या अट्टाहासापायी मुख्यमंत्री कमलनाथ विश्‍वासदर्शक ठरावाला लांबवत आहेत. भाजपाने आमदारांचा घोडेबाजार केला, हा आरोप मान्य केला तरी ही कोणामुळे आली याचे उत्तर मात्र काँगे्रसकडून दिले जात नाही. मध्यप्रदेश सारखे महत्वाचे राज्य आयते हातात येत असेल तर भाजपा कशासाठी मागेपुढे पहात बसेल. भाजपा नेत्यांनी ऑपरेशन लोटस कधीच लपविले नाही. मध्यप्रदेश मध्ये जे घडत आहे, तेच कर्नाटकात दोन वर्षापूर्वी घडले होते. त्यावेळीही असाच आकड्यांचा खेळ करुन भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखले गेले. तेव्हा भाजपाने कर्नाटकातही आधी सरकार स्थापन होवू दिले, त्यानंतर जेडीएसचा पुरता तमाशा होवू दिला आणि दिड वर्षानंतर ऑपरेशन लोटस पूर्णत्वास नेले. आज मध्यप्रदेशात तेच घडत आहे, बहुमत सिध्द करणे किंवा राजीनामा देणे हे दोनच पर्याय समोर असताना मरणाला रात्र आडवी करीत 10 दिवस सरकार वाचविण्यामुळे वास्तव बदलणारे नाही. ज्योतीरादित्य सिंधीया यांची नाराजी कमलनाथ सरकारचा कर्दनकाळ ठरली आहे. राहुल गांधी व ज्योतीरादित्य सिंधीया वर्गमित्र असल्याचे सांगितले जाते, तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा अजुन ठळक दिसतात. कारण राहुल गांधी आपल्या वर्गमित्राशी चर्चा करण्यात अपयशी ठरले आहेत; तरीही त्यांचे नेतृत्व लादण्याची अगतिक वेळ पक्षनेत्यांवर आली आहे. 

 

मध्यप्रदेश आणि कर्नाटक ही दोन ठळक उदाहरणे भाजपा नेत्यांचे मनसुबे दाखविण्यासाठी पुरेशी आहेत. आज मध्यप्रदेशात जे घडले तेच इतर राज्यातही घडू शकते. महाराष्ट्र व राजस्थान येथील राजकारण मध्यप्रदेश व कर्नाटकाच्या वळणावर जायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार गाठोड्यात मलिदा आहे, तोपर्यंत सुरळीत चालणार आहे. जेव्हा मलिद्याच्या वाटपावरुन भांडण सुरु होतील, तेव्हा महाराष्ट्रातील ज्योतिरादित्य पुढे आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात सारे आलबेल दिसत असले, तरी शरद पवार यांच्या इशार्‍याशिवाय काहीही घडत नाही. राष्ट्रवादीच्या आक्रमकपणापुढे काँगे्रस व शिवसेनेतील अनेक पक्षनेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे 100 दिवस पूर्ण केल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे पहायला मिळत नाही. महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केल्यानंतरच पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे. 

 

मध्यप्रदेशात काय घडते आणि घडणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज घडीला तरी मुख्यमंत्री कमलनाथ दहा दिवस सरकार वाचविण्यात यशस्वी झाले असले तरी 10 दिवसानंतरही आकड्यांचा खेळ जुळविण्यात यश येण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री मरणाला रात्र आडवी करीत आहेत. या 10 दिवसात घडणार्‍या घडामोडींवर महाराष्ट्र व राजस्थानच्या राजकारणाची स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य जे असेल तेच भवितव्य राजस्थान व महाराष्ट्राचे राहणार आहे.