शाहीनबाग कॉंग्रेससाठी 'सापळा' होता!
दिल्लीतील शाहीनबागच्या आंदोलनाला 100 दिवस होत आले आहेत. नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून सुरु झालेले आंदोलन एवढे प्रदिर्घ काळापर्यंत का ताणले गेले? याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या मुत्सद्दीपणाने कलम 370 हटविले आणि कश्मिरमध्ये एक दगड कोणाला हातात घेवू दिला नाही. त्यांच्याकडून शाहीनबागच्या बाबतीत ही चुक का झाली असेल? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. दिल्ली विधासभेच्या निवडणूकांवर डोळा ठेवून जाणीवपूर्वक या आंदोलनकाकडे कानाडोळा केल्याचे वरवर दिसत असले तरी यामध्ये अनेक पैलू दडलेले आहेत.
जेव्हा इशान्य दिल्लीत उसळलेली दंगल आणि सरकारचा बेसावधपणा बुचकळ्यात टाकणारा असला तरी सत्ताधारी पक्षाकडून खुप मोठे राजकारण खेळले जात होते हे वास्तव आहे. सरकारला दिल्लीतील दंगली अपेक्षित नव्हत्या, परंतु शाहीनबाग भाजपा विरोधकांसाठी लावलेला सापळा नक्कीच होता. कारण शाहीनबागमध्ये सरकारने बुरखेधारी मुस्लिम महिलांच्या जमावासमोर हात टेकलेले पाहून भाजपा विरोधकांना भलताच जोर चढला होता. त्यामुळेच देशाच्या अन्य भागात लहान मोठ्या गावागावात शाहीनबागामधून विरोधकांची जत्रा जमु लागली होती. या नागरिकता विरोधात सजलेल्या बागांमध्ये लहानसहान पक्ष व संघटनांनी भरकटत जाणे समजू शकते, परंतु देशातील सर्वात मोठा काँगे्रस पक्ष आपल्या सापळ्यात अडकेल याची भाजपा नेत्यांना कल्पना नव्हती, जर असेल तर काँगे्रसची या सापळ्यात पुरती शिकार झाली असेच म्हणावे लागणार आहे.
देशातील सर्व समस्या वार्यावर सोडून काँगे्रस शाहीनबागेत नित्यनेमाने हजेरी लावू लागली. शाहीनबाग मतांच्या बागा फुलविण्यासाठी महत्वाचे केंद्र समजुन सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी शाहीन बाग पुरक वक्तव्य करीत होती, तर मनिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद, पी.चिंदबरम अशी मातब्बर नेते मंडळी शाहीनबागेत जावून मनसोक्त बडबड करीत होते. देशात कोणतीच समस्या शिल्लक नसावी आणि शाहीनबाग हीच समस्या महत्वाची समजुन आपली सर्व शक्ती शाहीनबाग व देशातील इतर भागातील बागांमध्ये लावत बसले. त्यामुळे दिल्लीसह संपूर्ण देशातील हिंदु मतदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. याचे कमी जास्त परिणाम दिल्लीच्या निकालावर झाले पण त्याचे दुरोगामी परिणाम हिंदुच्या मनावर झालेले आहेत. दिल्ली निवडणूकीनंतर झालेल्या दंगलीत हिंदुच्या मनातुन काँगे्रस पक्ष व नेते पुर्णपणे उतरुन गेले आहेत. काँगे्रस शाहीनबागेत एवढी गुंतली की, मध्यप्रदेश सारखे राज्य आपल्या हातातून जात आहे, याची पुसटशी कल्पनादेखील काँगे्रसच्या नेत्यांना आली नाही. यामुळेच नरेंद्र मोदी व अमित शहांनी जाणिवपुर्वक शाहीनबागेत काँग्रेस पक्षाने आपले सर्वस्व पणाला लावावे यासाठीच लावलेला सापळा असावा अशी दाट शंका येते.
मध्यप्रदेशात आज जे घडत आहे, त्यामागे शाहीनबाग महत्वाचे कारण आहे. काँगे्रस पक्ष आणि नेते देशातील हालचालींकडे दूर्लक्ष करुन नको तेवढी शक्ती शाहीनबाग व देशातील विविध ठिकाणी तयार झालेल्या बागांमध्ये लावत बसले. आजही देशातील प्रत्येक ठिकाणच्या बागामध्ये काँगे्रसचे पुढारी व कार्यकर्तेच अगे्रसर आहेेत, आणि भाजपाला हेच हवे होते. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी लिहिलेल्या पटकथेप्रमाणे सार्या घटना घडत होत्या. तरीही काँगे्रस निवांतपणे शाहीनबागेत रममाण होती. मध्यप्रदेशात जेव्हा वादळ आले तेव्हा काँगे्रस खडबडून जागी झाली पण तोपर्यंत खुप वेळ झाला होता. कमलनाथ, दिग्विजयसिंग पक्षनेत्यांना सारेआलबेल असल्याचे सांगत असले तरी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या एन्ट्रीने भाजपाची पटकथा काय होती, हे काँगे्रसला कळुन चुकले पण तो पर्यंत काँगे्रसच्या हातातून सारे काही निसटून गेले होते.
मध्यप्रदेश सारख्या राज्यात भाजपाने पुढाकार न घेता कमलनाथ, दिग्विजयसिंग व ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या संघर्षातून ऑपरेशन लोटसचे घबाड आयतेच भाजपाच्या हाताला लागले. प्राप्त परिस्थितीचा फायदा घेत मोदी व शहांनी ज्योतिरादित्य सिंधीयांच्या इगोला कुरवाळत मध्यप्रदेशात लक्ष घातले, तोपर्यंत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी आरामात झोपा काढत होते. मध्यप्रदेशात राजकीय बंडाळी होईपर्यंत काहीजणांना शाहीनबाग मतांची खाण वाटत होती, तर काहीजणांना दिल्लीची दंगल आपल्या फायद्याची नाही याचे दुःख सतावत होते. तर काहीजणांना मध्यप्रदेशाची सत्ता गमावण्याची फ़िकीर होती? म्हणून सगळा मामला सापळ्यासारखा वाटतो. अमित शहांनी जाणिवपुर्वक मागल्या दोन महिन्यात म्हणजे नागरिकत्व कायदा संमत केल्यापासूनच मध्यप्रदेशात उलथापालथ करण्याचे काम हाती घेतलेले असावे. त्यांच्या हालचालीकडे काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून शाहीनबागेला मोकळीक दिली असावी काय? देशाच्या अन्य भागात तसेच आंदोलन पेटवण्याच्या धमक्यांकडे शहांनी गृहमंत्री असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले असेल काय? अशा अनेक प्रश्नांची मालिका तयार झालेली असली तरी याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही, हेच अमित शहांच्या सापळ्याचे वैशिष्ठ्य आहे.
शाहीनबाग आणि त्याच्या आजुबाजूला अनेक घटना घडत असल्या तरी काँगे्रसला उघडे पाडण्यात भाजपाला पूर्णपणे यश आले आहे. जिथे जिथे शाहीन बागा तयार झाल्या त्या परिसरात हिंदु मतदारांच्या मनात अनामिक भीती व दडपण तयार झाले आहे. या बागांमधील चिथावणीखोर भाषणांना काँगे्रस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहुन टाळ्या वाजवत आहेत हे विशेष! काँगे्रसला निवडणूकांमध्ये सतत होणारा पराभव आणि भाजपाच्या राजकारणाचा हँगओव्हर उतरविण्यासाठी शाहीनबागेचा भडका व तडका महत्वाचा वाटला म्हणूनच तिथे शशी थरूर यांच्यापासून चिदंबरम यांच्यापर्यंत नेत्यांची फौज काँग्रेसने तैनात केली. त्या भागातल्या बुरखेधारी मुस्लिम महिला वृद्धांना शशी थरूर अथवा पी.चिदंबरम यांच्या उच्चभ्रू हिंग्लिश भाषणातल्या चार ओळीही समजू शकत नाहीत पण तरीही त्यांनी तिथे जावून आपला आवाज वाढविला होता. त्यामागे दिल्ली विधानसभेत मुस्लिमांची भरघोस मते मिळावीत ही भाबडी आशा होती. प्रत्यक्षात मात्र तो सापळा होता आणि त्यात काँग्रेसचे दिग्गज अडकल्याने मध्यप्रदेशात चाललेल्या आक्रमक हालचाली दुर्लक्षित राहील्या.
त्यामुळेच इतक्या सहजपणे ज्योतिरादित्य सिंधीया व अन्य काँग्रेस आमदार मंत्र्यांना फ़ोडणे भाजपाला शक्य झाले. ते कधी भोपाळहून गायब झाले आणि बंगलोरला पोहोचले, त्याचाही थांगपत्ता श्रेष्ठींना लागला नाही. त्यामागे शिंदे यांची प्रेरणा होती, त्याचा सुगावाही काँगे्रसच्या नेत्यांना लागू शकला नाही. कारण शाहीनबागेकडे दूर्लक्ष करण्याचे सोंग करीत अमित शहांनी जणू बिर्याणी खायला बसवलेले होते. तर उरलेल्यांना ट्रम्प यांच्या वरातीमध्ये नाचायला पाठवलेले होते. प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारला सुरूंग लावण्याची पुर्ण सज्जता उरकून घेण्यात आलेली होती. त्यामुळेच दंगल होऊन काँग्रेसने संसदेत धुमाकुळ घातला; तेव्हा त्यांना येऊ घातलेल्या मध्यप्रदेशी वादळाची चाहूलही लागली नव्हती. शाहीनबागेतील राजकारणाचा आऊटपुट हाती आला होता आणि हाती किती आमदार उरलेत, त्यांची नावेही मुख्यमंत्री कमलनाथ यांना सांगता येत नव्हती. मध्यप्रदेशाच्या राजकारणाचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी शाहीनबागेचा सोईस्कर वापर अमित शहांनी करुन घेतला असावा याची दाट शंका आहे. शाहीनबाग संयोग नाही तर प्रयोग आहे असे सांगत काँगे्रसच्या तमाम नेत्यांचे बुरखे व भेसुर चेहरे देशापुढे आणण्याचे काम मोदी व शहांनी केले. अमित शहांच्या सापळ्यात काँगे्रस पूर्णपणे अडकली आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असतानाही शाहीनबागेतील आंदोलक सरकारला कोंडीत पकडण्याच्या मनस्थितीत आहेत, खरेतर कोरोना सारख्या संकटाला सीएए, एनपीआर व एनआरसी सोबत जोडण्याची गरज नाही परंतु आंदेालकांना वाटते की मोदी-शहांनी नाक घासत शाहीनबागेत यावे आणि समजुत काढावी, पण असे होणार नाही. मोदी-शहांचा मुड नाक घासण्याचा नसल्यामुळे इगो कुरवाळत बसण्याची गरज नाही. कोरोनाचे संकट भाजपानिर्मित नाही. त्यामुळे मोठ्या मनाने शाहीनबाग मागे घेण्याची गरज आहे. देशातील सर्व जनता भयभीत असताना राजकीय अजेेंडा म्हणून आंदोलनाचा दुराग्रह केला जात असेल तर कायदा सुव्यवस्था नाही तर आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. तेव्हा सरकाराने पुढे येवून सक्तीने आंदोलन मोडून काढावे अशीच शाहीनबाग आंदोलकांची इच्छा आहे म्हणून डॉक्टर पाठवा, आरोग्यसेवा पाठवा अशा अव्यवहार्य मागण्या केल्या जात आहेत. शाहीनबागेचा प्रयोग काँगे्रससाठी आत्मघाती ठरला तसा तो आंदोलकांसाठी दिशाहीन ठरू नये एवढीच या महासंकट काळात देशवासियांची अपेक्षा आहे.